…अन् गावकऱ्यांनी चक्क काढली मगरीची अंत्ययात्रा

crocodile
ज्या मगरीला संरक्षक म्हणून पूजले त्या मगरीचा मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांनी तिची अंत्ययात्रा काढण्याची घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. या मगरीच्या मृत्यूनंतर गावकरी एवढे भावूक झाले, की त्यांनी एखाद्या माणसाप्रमाणे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले.

रायपूर येथून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या बेमेटारा जिल्ह्यातील बावा मोहोत्रा गावात ही घटना घडली आहे. या गावाजवळीत तळ्यात सुमारे 130 वर्षांची नर मगर होती. तिला त्यांनी प्रेमाने ‘गंगाराम’ असे नाव दिले होते. तिला ते देवासारखे पूजत होते.

या मगरीचा मृत्यू झाल्यानंतर शोकग्रस्त गावकऱ्यांनी तिची अंत्ययात्रा काढली आणि त्या दिवशी त्यांनी चूलही पेटविली नाही. तिच्या अंत्ययात्रेत सुमारे 500 गावकऱ्यांनी भाग घेतला.

या तलावाच्या काठावर मगरीचे स्मारक उभारण्याचे गावकऱ्यांनी ठरविले असून या मगरीच्या स्मृत्यर्थ मंदिर बांधण्याचे नियोजन केले, असे गावचे सरपंच मोहन साहू यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

गावातील तलावामध्ये ही मगर मंगळवारी मृत आढळली होती. ती 3.4 मीटर लांब होती. स्थानिक लोकांनी वन विभागाला माहिती दिली आणि तिचा मृतदेह पाण्यामधून बाहेर काढण्यात आला.

गंगाराम या गावातील तलावामध्ये 100 वर्षांहून अधिक काळ राहिला होता कारण आपल्या दिवंगत आजोबांनीही त्यांच्या लहानपणापासून त्याला पाहिले होते, असा दावा साहू यांनी केला. गावातील लहान मुलांसह प्रत्येक जण तलावामध्ये दररोज स्नान करत असे, परंतु या मगरीने त्यांच्यावर कधीही हल्ला केला नाही, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment