कन्हैया, उमर, अनिर्बन भट्टाचार्य यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर दाखल होणार देशद्रोहाचा गुन्हा

kanhiya-kumar
नवी दिल्ली – दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांनी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खलीद, अनिर्बन भट्टाचार्य यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर लवकरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.

२०१६ मध्ये कन्हैया, खलीद, भट्टाचार्य यांना देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक झाली होती. संसदेवर हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार अफजल गुरु याच्या फाशीविरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या परिसरात कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मोठा वाद या अटकेमुळे निर्माण झाला होता. तसेच, सत्ताधारी भाजपच्या हितसंबंधांसाठी कारवाई केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी करत पोलिसांना दोषी धरले होते.

हे प्रकरण शेवटच्या टप्प्यात असून पोलिसांच्या पथकाला पुरावे जमा करण्यासाठी विविध राज्यांत जावे लागल्यामुळे चौकशी गुंतागुंतीची बनली होती. आरोपपत्र लवकरच दाखल होईल, असे पटनाईक म्हणाले. जेएनयूमधील वादग्रस्त कार्यक्रमानंतर या ठिकाणी देशविरोधी घोषणा देण्यात आल्या आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आरोप झाले होते. कन्हैया कुमारच्या अटकेनंतर त्याला देशभरात प्रसिद्धी मिळाली होती. तसेच, देशभरात त्याचा निषेधही करण्यात आला होता.

Leave a Comment