स्वत:च्या घरापासून सुरू होते महिलांचा आदर करणे – राहुल गांधी

rahul-gandhi
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी आदरपूर्वक सांगू इच्छितो की, आमच्या संस्कृतीत महिलांचा आदर करणे स्वत:च्या घरापासून सुरू होते, असे प्रत्युत्तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून दिले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचा लोकसभेत अपमान केला, असा मोदींनी आरोप केला होता.

संरक्षणमंत्र्यांचा ‘महिला’ म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांनी उपहास केला. याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल, असे मोदींनी जयपूर येथील सभेत म्हटले होते. राहुल गांधी यांनी यानंतर ट्विट करून अत्यंत आदरपूर्वक मी मोदींना सांगू इच्छितो की, आमच्या संस्कृतीत महिलांचा आदर करणे स्वत:च्या घरापासून सुरू होते. जबाबदारी झटकणे थांबवा. मर्द बना आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. आधीचा तुम्ही राफेल करार बाजूला केल्यानंतर हवाई दल आणि संरक्षण मंत्रालयाने त्यावर आक्षेप घेतला का? हो किंवा नाही? असे म्हटले आहे.

राफेल करारावर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन बोलत असताना जनतेच्या न्यायालयातून पंतप्रधान मोदी पळून गेले आहेत. त्यांनी आता महिला संरक्षण मंत्री सीतारामन यांना आपल्याला वाचवण्याची विनंती केली. मात्र, आपल्या अडीच तासांच्या भाषणानंतरही त्या मोदींना वाचवू शकल्या नाहीत, असे राहुल गांधींनी म्हटले होते. जनतेच्या न्यायालयात आम्ही राफेल करारावर प्रश्न उपस्थित केले. मोदींना आम्ही पुढे येऊन राफेल मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. तसेच, काँग्रेस पक्षही स्वतःची भूमिका स्पष्ट करेल, असे सांगितले. पण तुम्ही सर्वांनी पाहिले की, आपली छाती ५६ इंचाची असल्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधानांनी संसदेत पाऊल ठेवण्याचे धाडस केले नाही, त्यांनी उलट महिला संरक्षण मंत्री सीतारामन यांना पुढे केले. पण त्याही एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत, असे राहुल यांनी म्हटले होते.

Leave a Comment