पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवले म्हणून पोलिसांची अमानुष मारहाण

modi
सोलापूर – सोलापुरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर त्यांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले म्हणून त्यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

लोकशाहीचा गळा भाजप सरकार घोटत असल्याची टीका सध्या सर्वस्तरातून होते आहे. मारहाण झालेल्या युवकांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आम्ही लोकशाही मार्गाने निषेध करत असताना अमानुषपणे आम्हाला मारहाण करण्यात आली. ही हिटलरशाही असल्याची टीका या कार्यकर्त्यांनी केली.

मोदींनी सोलापूरकरांना २०१४च्या निवडणूक प्रचारादरम्यान अनेक आश्वासने दिली होती. त्यांनी ती पाळली नाहीत म्हणून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. त्यांनाही त्यावेळी मारहाण करण्यात आली. आतापर्यंत राजकीय आंदोलने झाली आणि होत राहतील. पण या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यावर पोलिसी अत्याचाराची कल्पना येते. आता याबाबत काँग्रेसचे नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतरच या घटनेला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई होणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.