देशात उरले आता केवळ एक मनुष्यरहित फाटक

railway-gate
भारतीय रेल्वेच्या रेल्वेमार्गावरील सर्व फाटक संपविण्याचे लक्ष्य रेल्वेने साध्य केले आहे. आता देशात केवळ एक मनुष्यरहित फाटक उरले आहे, असे रेल्वेने जाहीर केले आहे.

गेल्या एका वर्षात 3,478 मनुष्यरहित फाटक बंद करण्यात आले. जोधपुर डिव्हिजनमधील बाडमेर-मुनाबाओ भागातील मनुष्यरहित फाटक हे समाप्त करण्यात आलेले फाटक शेवटचे ठरले. आता अलाहाबाद विभागातील एक फाटक बंद करण्यासाठी उरलेला आहे. स्थानिक लोकांच्या विरोधामुळे ते बंद करता आलेले नाही, मात्र या वर्षाच्या अखेरपर्यंत ते बंद करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

रेल्वेने गाड्यांची अत्यंत कमी वर्दळ असलेल्या मार्गावरील फाटक एक तर बंद केले किंवा जवळच्या मनुष्ययुक्त फाटकांशी त्यांना संलग्न केले. काही ठिकाणी रेल्वेमार्गाच्या खालून जाणारी सडक किंवा भुयारी मार्ग बनविण्यात आला.

‘‘ही रेल्वेच्या दृष्टीने फार मोठी कामगिरी आहे कारण हे मनुष्यरहित फाटक हे मृत्यूचे जाळे आहेत. वर्ष 2009-10 मध्ये केवळ 930 मनुष्यरहित फाटक बंद करण्यात आले होते तर 2015-2016 मध्ये 1253 मनुष्यरहित फाटक बंद करण्यात आले. गेल्या सात महिन्यात हे कार्य गेल्या काही वर्षांच्या तुलनेत पाचपट वेगाने करण्यात आले,’’ असे एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

मनुष्यरहित फाटकांवर2014-2015 मध्ये वेगवेगळ्या घटनांत 130 लोकांचा मृत्यू झाला होता, 2015-16 मध्ये अशा फाटकांवर 58 लोकांचा आणि 2016-17 मध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment