माकडांचे कुटुंब नियोजन गरजेचे – दिल्लीच्या ‘प्राणी कल्याण धोरणा’चा सल्ला

monkey
दिल्ली सरकारने आपले पहिली वहिले प्राणी कल्याण धोरण बुधवारी जाहीर केले. यात माकडांचे कुटुंब नियोजन करण्याचे तसेच भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचे सूतोवाच केले आहे.

दिल्लीचे विकासमंत्री गोपाल राय यांच्या उपस्थितीत बुधवारी या धोरणावर चर्चा झाली. “प्राणी आरोग्य आणि कल्याण धोरण 2018′ असे नाव या धोरणाला देण्यात आले आहे. “माकड आणि भटकी कुत्री यांच्यामुळे होणाऱ्या उपद्रवाला सामावून घेणारे प्राणी कल्याण धोरण आतापर्यंत अस्तित्वात नव्हते. आम्ही वेळोवेळी या धोरणात सुधारणा करू,” असे राय यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

प्राणी प्रजनन नियंत्रण (एबीसी) उपक्रमांतर्गत माकडांचे कुटुंब नियोजन करण्याच सूतोवाच या धोरणात करण्यात आले आहे. तसेच गैरसरकारी संघटनांच्या मार्फत दिल्लीतील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचे परिणाम संतोषजनक नाहीत. त्यामुळे या कार्यक्रमाला नवीन स्वरूप देण्यात येईल, असेही धोरणात म्हटल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

दिल्लीतील बहुतांश भागात माकडांच्या टोळ्यांचा उच्छाद असतो. या टोळ्या शहरात आल्यावर महापालिका त्यांना पकडून जंगलात सोडते. मात्र माकडांच्या टोळ्या पुन्हा शहरात घुसतात आणि प्रचंड नासधूस करतात. याआधी 2007 मध्ये दिल्लीचे उपमहापौर माकडांच्या टोळीच्या हल्ल्याने बंगल्याच्या गॅलरीतून पडून गंभीर जखमी झाले होते. डोक्याला मार लागून नंतर त्यांचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment