कंगनाचा ‘ठाकरे’साठी ‘मणिकर्णिका’ची तारीख बदलण्यास नकार

kangana-ranawat
अभिनेत्री कंगना राणावतने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटासाठी ‘मणिकर्णिका’ चित्रपटाची तारीख बदलण्यास नकार दिला असून फक्त ‘ठाकरे’ चित्रपट 25 जानेवारीला रिलीज व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती.

यापूर्वीच इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेल्या ‘चीट इंडिया’ चित्रपट आठवडाभर आधी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण ‘मणिकर्णिका’बाबत कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नव्हता. आपल्याला तारीख पुढे ढकलण्याबाबत कोणीच संपर्क साधला नव्हता. मुळात 25 तारखेला दोन चित्रपट प्रदर्शित झाल्यास काहीही फरक पडणार नसल्याचे कंगना म्हणाली. ती ‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या म्युझिक लाँचला बोलत होती.

कंगनासोबत ‘मणिकर्णिका’ चित्रपटात अंकिता लोखंडे, वैभव तत्त्ववादी, मोहम्मद झीशान अय्युब यांच्या मुख्य भूमिका आहेत. दिग्दर्शक क्रिश आणि अभिनेता सोनू सूद यांनी चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर कंगनाने चित्रपटाची सूत्रे हाती घेतली होती. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 च्या उठावावेळी ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीला दिलेल्या लढ्यावर आधारित हा चित्रपट आहे.

येत्या 25 जानेवारी रोजी देशभरात शिवसेना खासदार संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि कार्निव्हल मोशन पिक्सर्च निर्मित ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत असून मराठी भाषेसाठी अभिनेते सचिन खेडेकर यांनी आवाज दिला आहे. तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.