वर्मांनी संचालकपदाची सुत्रे हाती घेताच रद्द केले ‘त्या’ बदल्यांचे आदेश

alok-verma
नवी दिल्ली – सक्तीच्या रजेवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक आलोक वर्मांना पाठविण्यात आले होते. ही सक्तीची रजा रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर संचालकपदाची सुत्रे वर्मा यांनी हाती घेतली. वर्मा यांनी आपला कार्यभार सांभाळताच पहिला निर्णय घेतला आहे. त्यांच्या गैरहाजेरीत झालेल्या ७ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय त्यांनी रद्द केला आहे.

आलोक वर्मांना २३ ऑक्टोबर २०१८ ला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या जागी सहाय्यक संचालक एम. नागेश्वर राव यांनी या पदाची सुत्रे हाती घेतली होती. दुसऱ्याच दिवशी नागेश्वर राव यांनी ७ अधिकाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता. हे अधिकारी राकेश अस्थाना यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराचा तपास करत होते. बदली झालेल्या अधिकाऱ्यात डीवायएसपी ए. के. बस्सी, डीआयजी एम. के. सिन्हा, ए. के. शर्मा यांच्यासह इतरांचा समावेश होता.

वर्मा यांनी बुधवारी सकाळी १०.४५ वाजता पदभार स्वीकारला. यानंतर तातडीने त्यांनी बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश रद्द केले आहेत. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने वर्मा यांचे सक्तीच्या रजेचे आदेश रद्द केले. पण, जोपर्यंत त्यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराचा तपास पूर्ण होत नाही. तोपर्यंत त्यांना महत्वाचे निर्णय घेता येणार नाहीत.

Leave a Comment