शत्रुघ्न सिन्हांनंतर आता पासवानही पाटणा विमानतळावर ‘सामान्य’

ramvilas-paswan
पाटणा विमानतळावर अभिनेते व माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांच्या नंतर विद्यमान केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचाही व्हीआयपी दर्जा काढून घेण्यात आला आहे. पासवान यांच्या या दर्जाचा कालावधी वाढविण्याबाबत सक्षम प्राधिकरणाकडून आदेश न आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पासवान हे सोमवारी सकाळी माजी केंद्रीय मंत्री जयनारायण निषाद यांच्या अंत्यविधींसाठी पाटणा येथे पोचले होते. हा विधी पासवान यांच्या हाजीपुर या लोकसभा मतदारसंघात होता आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी हेही पासवान यांच्यासह या कार्यक्रमाला उपस्थित होते. पासवान हे सोमवारी संध्याकाळी दिल्लीला परतले. मात्र पासवान हे यावेळी वाहनातून विमानापर्यंत न जाता पायी जाताना दिसल्यामुळे स्थानिक पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न केला. त्यावर काही मीटर चालल्याने मला काही अडचण येत नाही, असे पासवान यांनी सांगितले.

“विमानतळावरील माझ्यासाठी दिलेली सुविधा 30 डिसेंबर रोजी संपली. या सुविधेच्या नूतनीकरणासाठी मी अर्ज करु शकलो नाही. काळजी करू नका, लवकरच मी व्हीआयपी बनेल,” असे ते हसत म्हणाले.

काही दिवस आधी पाटण्याचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव अतिमहत्त्वाच्या यादीतून काढून टाकण्यात आले होते.

याबाबत विचारले असता पाटण्यातील जयप्रकाश नारायण विमानतळाचे संचालक राजेंद्रसिंह लाहौरीया यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ही सुविधा वाढविण्यात किंवा बंद करण्यात विमानतळाची कोणतीही भूमिका नाही. आम्हाला ब्युरो ऑफ सिव्हिल एविएशन सिक्युरिटीकडून (बीसीएएस) आदेश मिळतो, असे ते म्हणाले.

Leave a Comment