संपकरी कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रशासनाकडून घर खाली करण्याची नोटीस

best
मुंबई – बेस्टचे कर्मचारी कामगार संघटनांच्या देशव्यापी संपात सहभागी झाले असून बेस्टची सेवा आर्थिक राजधानीत विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. यावर बेस्ट प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत भोईवाडा येथील बेस्ट वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरे खाली करण्याच्या नोटीस दिल्या आहेत.

संपातून बेस्टमधील शिवसेनेच्या कामगार संघटनेने माघार घेतली आहे. काही कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी याला विरोध करत राजीनामे दिले आहेत. बेस्टचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. मंगळवारी संपाच्या पहिल्या दिवशी मुंबईच्या रस्त्यावर बेस्टची एकही बस नसल्याने मुंबईकरांचे हाल झाले.

कामगार संघटना आणि प्रशासनाच्या बैठकीत तोडगा निघाला नाही. मुंबईच्या रस्त्यांवर ५०० बस उतरविण्याचा दावा शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेने केला होता. मात्र, प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे कर्मचारी कामावर हजर झाल्यामुळे शिवसेनेचा दावा फोल ठरल्याचे चित्र आहे.