हकालपट्टीच्या भीतीने किमान 57 रोहिंग्यांचे भारतातून पलायन

rohingya
म्यानमारमध्ये निर्वासित करण्याच्या भीतीने किमान 57 रोहिंग्यांनी बांग्लादेशात पलायन केले आहे, असे बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

“गेल्या शुक्रवारपासून 57 रोहिंग्या मुस्लिम येथे भारतातून आले आहेत. जिथे नवीन प्रवाशांना सहसा ठेवले जाते त्या संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाच्या (यूएनएचसीआर) संक्रमण शिविरांमध्ये त्यांना आम्ही पाठविले आहे. त्यापूर्वी आम्ही त्यांना अन्न व जीवनाश्यक वस्तू दिल्या,” असे कुतुपालाँग शरणार्थी शिबिराचे प्रभारी रेझौल करीम यांनी ईएफई या वृत्तसंस्थेला सांगितले.

“भारतीय अधिकाऱ्यांनी आम्हाला म्यानमारला परत पाठविण्यासाठी एक यादी तयार केली असल्याचे आम्ही ऐकले आहे. त्यामुळे आम्ही भारतातून पळून आलो. यातील काही रोहिंग्या भारतात काही वर्षांपासून वास्तव्यास होते,” असे या रोहिंग्यांनी बांगलादेशच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

यातील 17 रोहिंग्यांना शुक्रवारी अटक करण्यात आली, असे त्रिपुरा सीमेजवळ कोम्मिला जिल्ह्यातील ब्राह्मणपारा पोलिस ठाण्याचे प्रभारी शाजहान कबीर यांनी ईएफईला सांगितले.

“त्यांनी आम्हाला सांगितले, की त्यांना इतर रोहिंग्यांसोबत राहण्यास जायचे आहे. त्यामुळे त्यांना कोक्स बाजार येथे पाठविले,” असे ते म्हणाले.
भारतीय अधिकाऱ्यांनी एका रोहिंग्या कुटुंबाचे म्यानमारमध्ये प्रत्यार्पण केले. त्यानंतर बांगलादेशमध्ये रोहिंग्या शरणार्थ्यांची संख्या वाढली आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाची शरणार्थी एजन्सी यूएनएचसीआरने गुरुवारी सांगितले.

Leave a Comment