दिल्ली उच्च न्यायालयाचा औषधांच्या ऑनलाईल विक्रीवरील बंदी हटविण्यास नकार

medicine
नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाने औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर घालण्यात आलेली बंदी हटविण्यास नकार दिला असून ६ फेब्रुवारीपर्यंत उच्च न्यायालयाने ही बंदी वाढविली आहे. हा निर्णय न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला.

केंद्र सरकारने यावेळी आपली बाजू मांडताना म्हटले आहे, की अद्याप औषधांच्या ऑनलाइन विक्रीसंदर्भातील नियम तयार करण्यात आलेले नाहीत. तसेच विविध समित्यांनी सादर केलेल्या अहवालांवरही अभ्यास सुरू आहे. यावर ऑनलाइन औषधांच्या विक्रीवर घालण्यात आलेली बंदी पुढील आदेशापर्यंत जैसेथेच राहील, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी, औषधांच्या ऑनलाइन विक्रीवरील बंदी २० डिसेंबर २०१८ रोजीही उच्च न्यायालयाने लांबवली होती.

दिल्ली येथील डर्मेटोलॉजिस्ट जहीर अहमद यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. यात म्हणण्यात आले आहे, की कुठल्याही प्रकारचे नियम औषधांच्या ऑनलाइन विक्रीसाठी नसल्यामुळे रुग्णांसाठी हे अत्यंत घातक सिद्ध होऊ शकते. याचिकाकर्त्याच्यावतीने बोलताना वकील नकुल मेहता न्यायालयात म्हणाले, की ड्रग्स अॅन्ड कॉस्मेटिक्स अॅक्ट १९४० आणि फार्मसी अॅक्ट १९४८ नुसार औषधांच्या ऑनलाइन विक्रीची परवानगी नाही.

Leave a Comment