सर्जिकल स्ट्राईकच्या कल्पनेला काँग्रेसचा विरोध होता – परेश रावल

paresh-rawal
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्यांनंतर लष्कराने सर्जिकल स्ट्राईकची कल्पना मांडली होती मात्र काँग्रेस पक्षाने ती नाकारली होती, असा दावा अभिनेता व खासदार परेश रावल यांनी म्हटले आहे.

भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी : दि सर्जिकल स्ट्राईक’ या आगामी चित्रपटात रावल यांची प्रमुख भूमिका आहे. यानिमित्त एएनआय वृत्तसंस्थेला मंगळवारी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.

“आपल्या सैन्याच्या बाजूने उभे राहण्याऐवजी आणि त्यांना पाठिंबा देण्याऐवजी तेव्हाच्या सरकारने त्याला नकार दिला,” असे ते म्हणाले.
सर्जिकल स्ट्राईकची कल्पना फेटाळून लावण्यामागील काँग्रेसच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उभे करताना रावल म्हणाले, “लोकांना आपल्या सैन्याच्या सामर्थ्यावर शंका वाटू लागली. सरकारने नकार का दिला? सरकारला मतपेढीची काळजी वाटत होती का?”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईकला हिरवा झेंडा दाखवून भारतीय सैन्याच्या सामर्थ्याबद्दल लोकांच्या शंकांचे निरसन केले, असे ते म्हणाले.
“ही केवळ राजकीय इच्छाशक्तीची गोष्ट होती. आपल्याकडे एक समर्थ सेना होती आणि आक्रमणासाठी सज्ज आणि तयार होती,” असे रावल म्हणाले.

“उरी: द सर्जिकल स्ट्राइक” हा राजकीय थ्रिलर चित्रपट आहे आणि अशा आक्रमणासाठी काय तयारी करावी लागते, हे त्यात दर्शविले आहे, असे ते म्हणाले.

Leave a Comment