‘आप’मधून बाहेर पडलेल्या नेत्याने काढला स्वतःचा पक्ष

sukhpal-singh
आम आदमी पक्षाचा (आप) राजीनामा दिलेल्या एका प्रमुख नेत्याने मंगळवारी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. हा पक्ष केवळ पंजाबवर केंद्रीत अशेल आणि प्रादेशिक पक्ष असेल, असे या नेत्याने सांगितले.

या नव्या पक्षाचे नाव पंजाबी एकता पार्टी असेल, असे सुखपाल सिंह खैरा यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत ‘आप’चे सहा आमदार कंवर सिंह संधू, जगदेव सिंह कमालु, जगतार सिंह हिस्सोवाल, पीरमल सिंह खालसा, मास्टर बलदेव सिंह आणि नाजर सिंह मानशहिया हे उपस्थित होते, असे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. खैरा हे 2017 साली झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आप पक्षाच्या तिकिटावर कपूरथला जिल्ह्यातील भुलत्थ येथून निवडून आले होते. खैरा यांनी पक्ष सोडण्याआधी पक्षप्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे भारतीय व पंजाबी लोकांच्या नवीन पर्यायाचे स्वप्न चक्काचूर केले, असे ते म्हणाले होते.

खैरा हे पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्या पदावरून काढल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांनी रविवारी ‘आप’च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही.

Leave a Comment