भारतातच होणार आयपीएल २०१९

iplcup
जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट लीग असा लौकिक मिळविलेल्या आयपीएलच्या १२ व्या सिझनचे सामने कुठे होणार याचा खुलासा झाला असून हे सामने भारतातच आयोजित केले जाणार आहेत. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासक समितीने हा निर्णय जाहीर केला. २०१९ मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने हे सामने अन्य देशात आयोजित केले जातील असे सांगितले जात होते.

नियुक्त समितीने आयपीएल सामने होणारी शहरे आणि केंद्रीय तसेच राज्य एजन्सी यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने हे सामने २३ मार्च पासून सुरु करावेत असा प्रस्ताव आल्याची माहिती दिली आहे. आयपीएल सामन्याचे पूर्ण वेळापत्रक संबंधितांशी सल्ला मसलत केल्यावर जाहीर केले जाणार आहे. या पूर्वी दोन वेळा म्हणजे एकदा २००९ साली हे सामने द. आफ्रिकेत आयोजित केले होते तर २०१४ साली काही सामने युएइ मध्ये खेळवले गेले होते.