भारतीयांना दरिद्री म्हणणाऱ्या अमेरिकी ब्लॉगरला नेटकऱ्यांनी सुनावले

blogger
भारतीय लोक एवढे गरीब आहेत, की त्यांना आयफोन घेणे परवडत नाही असे म्हणणाऱ्या अमेरिकी ब्लॉगरला नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या या महिलेचा आयफोन चोरीला गेला होता तेव्हा तिने भारतीयांवर तोंडसुख घेतले होते.

कॉलीन ग्रॅडी असे या अमेरिकी तरुणीचे नाव आहे. ती डिसेंबर 2018 मध्ये भारतात जयपूर येथे फिरण्यास आली होती. त्यावेळी तिचा आयफोन एक्स कसा हरवला, याचे वर्णन तिने ब्लॉगमध्ये केले होते.

“होय, मी आजपर्यंत पाहिलेल्या सर्वात गरीब आणि अत्यंत गर्दी असलेल्यांपैकी एका देशात मी तो गमावला आहे,” असे तिने लिहिले होते. या देशातल्या काही लोकांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा जास्त किंमत या फोनची होती. त्यामुळे तो परत मिळण्याची मला अपेक्षा नव्हती. ज्याला हा फोन सापडेल त्याला त्याचे काय करावे, हे देखील कळणार नाही, असेही तिने म्हटले होते.

तिच्या या टिप्पण्यांबद्दल चिडलेल्या सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांनी तिला धारेवर धरले. तिची ही टिप्पणी वंशवादी असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

विशेष म्हणजे कोलिन हिला त्याच दिवशी एका स्थानिक माणसाचा फोन आला. तिचा फोन सापडल्याचे त्याने सांगितले. अखेर दीड तासांनी तिला तिचा फोन परत मिळाला.

Leave a Comment