तमिळनाडूच्या मंत्र्याला दंगल प्रकरणी 20 वर्षानंतर 3 वर्षांचा तुरुंगवास!

minister
तमिळनाडूतील एका विद्यमान मंत्र्याला दंगल प्रकरणी 20 वर्षानंतर 3 वर्षांचा तुरुंगवास देण्यात आला आहे. यामुळे सत्ताधारी अण्णाद्रमुक सरकारला धक्का बसला आहे. अर्थात या निकालाच्या विरोधात दाद मागण्याचा निर्णय या मंत्र्याने घेतला आहे.

तमिळनाडूचे मंत्री बालकृष्ण रेड्डी यांना सोमवारी विशेष न्यायालयाने कठोर कारावासाची ही शिक्षा सुनावली.

रेड्डी हे तमिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री आहेत. त्यांच्यावरील हा खटला 30 सप्टेंबर 199 8 रोजी घडलेल्या दंगलीशी संबंधित आहे. होसूर येथे अवैध दारूच्या विरोधात निषेध करताना दंगलीत भाग घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यावेळी ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते. खासदार आणि आमदारांसाठीच्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश जे. शांती यांच्या समोर खटल्याची सुनावणी झाली. या प्रकरणी रेड्डी यांच्याशिवाय अन्य 14 जणांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मात्र न्यायाधीशांनी रेड्डी यांच्या वकीलाची विनंती मान्य करून त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळए मद्रास उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, या शिक्षेवर प्रतिक्रिया देताना विरोधी द्रविड मुन्नेत्र कऴगम (डीएमके) पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी रेड्डी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली. मुख्यमंत्री के. पळनिस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुक सरकारसाठी ही घटना लज्जास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment