ऋषभ पंतच्या नावावर जमा झाले हे ६ विक्रम

rishabh-pant
सिडनी – ७१ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला त्याच्याच देशात जाऊन धूळ चारत विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिकेवर विजय मिळवली. भारतीय संघाला या मालिकेत नवा स्टार खेळाडू मिळाला आहे. कांगारुंच्या भूमीत भारताच्या महेंद्रसिंह धोनीचा उत्तराधिकारी मानला जाणऱ्या ऋषभ पंत याने छाप सोडली आहे. आतापर्यंत त्याने केवळ ९ कसोटी सामने खेळले आहे. त्याने त्यात ६ नवे जागतिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पंतने पदार्पण केले होते. दुसऱ्याच चेंडूवर आदिल राशिदच्या गोलंदाजीवर षटकार खेचून पदार्पण गाजविले. तो पहिला भारतीय फलंदाज ठरला ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांने धाव घेऊन सुरुवात केली. अशी कामगिरी करणारा जगातला तो बारावा खेळाडू ठरला. यापूर्वी इरिक फ्रीमॅन, कार्लाइस बेस्ट, कीथ डेबांग्वे, डेल रिचर्ड्स, शफीउल इस्लाम, जहरुल इस्लाम, अल अमीन हुसैन, मार्क क्रेग, धनंजय डिसिल्वा, कामरुल इस्लाम रब्बी आणि सुनील एंब्रुस यांनी अशी कामगिरी केली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या ओवल येथील पाचव्या कसोटी पंतने सामन्यात ११४ धावांची शतकी खेळी केली. तो इंग्लंडमध्ये शतक ठोकणारा पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. तसेच सर्वात कमी वयात शतक करणारा तो पहिला यष्टीरक्षक बनला. त्याने शतक ठोकले तेव्हा त्याचे वय २० वर्षे आणि ३४२ दिवस होते. त्याच्या पूर्वी अजय रात्राने २० वर्षे आणि १४८ दिवसांचा असताना शतक ठोकले होते.

पंतने अॅडिलेड कसोटीत यष्टीरक्षणात अप्रतिम कामगिरी करत ११ झेल पकडले. पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात ५ झेल पकडून ऋध्दिमान साहाचा १० झेल घेण्याचा विक्रम मोडीत काढला. २०१८ मध्ये केपटाऊन कसोटीत साहाने हा विक्रम केला होता. पंतने जॅक रसेल आणि एबी डिविलियर्स ११ झेल घेण्याच्या विक्रमांशी बरोबरी केली.

त्याने सिडनी कसोटी शतक ठोकून स्वत:ला सिद्ध करून दाखविले. ऑस्ट्रेलियात शतक करणारा पहिला यष्टीरक्षक बनला आहे. यापूर्वी फारुख इंजीनियर यांनी १९६७ साली ८९ धावा केल्या होत्या. पंतने तिसऱ्या कसोटीत १५९ धावांची नाबाद खेळी केली. या भारतीय यष्टीरक्षकांपैकी विदेशात काढलेल्या सर्वाधिक वैयक्तिक धावा आहेत. चेन्नईत महेंद्रसिंह धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२४ धावांची खेळी केली. बुध्दि कुंदरने चेन्नईत १९६४ साली १९२ धावा काढल्या होत्या. २००६ मध्ये धोनीने पाकिस्तानात १४८ धावांची खेळी केली होती.