अंगणवाडीतील जेवण चोरणारेही देशद्रोही – मेनका गांधी

maneka-gandhi
देशात मोठ्या प्रमाणात बनावट अंगणवाडी लाभार्थी आढळून आल्याबद्दल चिंता व्यक्त करतानाच या गैरव्यवहारासाठी दोषी असलेले लोक हे देशद्रोहीच असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी सोमवारी केले.

देशभरातील 97 अंगणवाडी कार्यकर्त्यांना उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमात गांधी यांनी हे वक्तव्य केले. ‘बालकांचे जेवण चोरण्यात जे सामील आहेत…ज्या अंगणवाड्या अशा कृत्यांत सामील आहेत…हा देशद्रोह आहे. तुम्ही केवळ एका बालकाला लाभापासून वंचित केले तर संपूर्ण देशाला मोठे नुकसान पोचविले,’ असे त्या म्हणाल्या.

अंगणवाड्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय केला, यामुळेही आपण व्यथित झालो आहोत. आपल्या मंत्रालयाला आसामात तीन लाख, झारखंडमध्ये एक लाख आणि उत्तर प्रदेशात 14 लाख बनावट लाभार्थी सापडले आहेत, असे त्या म्हणाल्या.

“आम्ही लाभार्थींच्या आधार कार्डांना जोडणे सुरू केले तेव्हापासून अंगणवाड्यातील पटावर असलेले परंतु वास्तविक अस्तित्वातही नसलेले असंख्य बालके आम्हाला आढळले. प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या मुलांसाठी अंगणवाड्यांनी पैसे मागितले होते,” असे त्या म्हणाल्या.

“आम्ही दर बालकामागे दररोज 10 रुपये खर्च करतो याचा अर्थ आसाममध्ये 30 लाख रुपये आणि उत्तर प्रदेशात 1.4 कोटी रुपये खर्च होतात. आम्ही या पैशातून बरेच काही करू शकलो असतो,” असे त्या म्हणाल्या.

Leave a Comment