लवकरच मुंबईवरुन नाशिक-पुण्यादरम्यान सुरु होणार लोकलसेवा

local
मुंबई – सध्या मुंबईवरुन पुणे आणि नाशिक या मार्गांवर रेल्वेची लोकल सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात आले असून मार्गातील घाटक्षेत्र लक्षात घेता चेन्नई येथील कारखान्यात त्यासाठी विशेष लोकलची निर्मिती करण्यात येत आहे. प्रत्यक्ष मार्गावर येत्या महिनाभरात गाडीची चाचणी घेतली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिल्यामुळे लोकल ट्रेनने मुंबईवरुन नाशिक आणि पुण्यात जाण्याचे स्वप्न आगामी काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मुंबईसाठी पुण्यातून सकाळी आठनंतर दुपारी साडेतीनपर्यंत एकही रेल्वे नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावर लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली जात आहे. तर मुंबई- नाशिक मार्गावरही लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली जात होती. मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक मार्गावरील प्रवाशांना या लोकल सेवेमुळे कमी खर्चात वेगवान प्रवास करता येईल आणि महामार्गांवरील वाहतुकीचा ताणही कमी होईल.