अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांना ऑनस्क्रीन एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण ही बहुचर्चित जोडी ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’नंतर आता पुन्हा एकदा एकत्र झळकणार असल्याचे वृत्त आहे. ही जोडी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या बायोपिकमध्ये ऑनस्क्रीनसुद्धा पती-पत्नीच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे.
‘८३’ मध्ये ऑनस्क्रीन पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार दीपिका-रणवीर ?
२५ जून १९८३ ही तारीख भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेली. भारतीय संघाने लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेट विश्वचषक जिंकल्यामुळे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला १९८३च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ‘८३’ हा चित्रपट येणार आहे. रणवीर सिंह हा या चित्रपटात तत्कालीन कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत असणार आहे. तर दीपिकाला कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले असल्याचे वृत्त ‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिले आहे. या भूमिकेला दीपिकाने अद्याप होकार दिला की नाही हे गुलदस्त्यातच आहे.
दरम्यान या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून ‘८३’च्या दिग्दर्शनाची धुरा ‘चक दे इंडिया’चे दिग्दर्शक कबीर खान यांनीच सांभाळली आहे. रणवीर क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका वठवत असल्यामुळे या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्यासाठी तो कपिल देव यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवत आहे.