भिकारी बनून जगभर फिरत आहेत इम्रान खान – सिंधच्या मुख्यमंत्र्यांची टीका

imran-khan
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे भिकारी बनून जगभर फिरत आहेत, अशी टीका पाकिस्तानी सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी केली आहे.

रविवारी मातली, बादिन येथे एका सभेत बोलताना शाह यांनी ही टीका केली. शाह हे पाकिस्तानच्या पीपल्स पार्टीचे (पीपीपी) नेते आहेत. “इम्रान खान हे देशोदेशी आर्थिक मदतीची भीक मागत फिरत आहेत,” असे ते म्हणाले.

राजकारणात कोणताही अनुभव नसलेल्या लोकांना सरकारमध्ये जागा मिळाली आहे, असेही ते म्हणाल्याचे सामा टीव्ही या वाहिनीने म्हटले आहे.
संयुक्त अरब अमीरातीने 5 जानेवारी रोजी पाकिस्तानला त्याची देणी देण्यासाठी 6.2 अब्ज डॉलरचे पॅकेज मंजूर केले होते.

आर्थिक मदत मिळविण्यासाठी खान यांनी नोव्हेंबरमध्ये चीनचाही दौरा केला होता. त्यावेळी सरकारी वृत्त वाहिनी असलेल्या पीटीव्हीने थेट प्रसारण करताना “बीजिंग” ऐवजी “बेगींग” डेटलाइन दाखविली होती. त्यावरून सोशल मीडियावर अनेकांनी त्यांची थट्टा उडविली होती.

पंतप्रधान बनल्यानंतर इम्रान यांनी अनेक देशांचे दौरे करून आर्थिक मदत मागितली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडूनही त्यांनी आठ अब्ज डॉलरच्या आर्थिक मदतीची मागणी केली होती.

Leave a Comment