उत्तर प्रदेशामधील भाजप नेत्याकडून मंदिरातच भोजनासह दारूच्या बाटल्यांचे वाटप

liquor
हर्दोई – उत्तर प्रदेशातील हर्दोई येथील मंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमप्रसंगी भाजप नेता नरेश अग्रवाल यांचा मुलगा नितीन यांनी दारूच्या बाटल्या वाटल्याने खळबळ उडाली आहे. दारूच्या बाटल्या लोकांना देण्यात आलेल्या जेवणाच्या पॅकेटसमधून देण्यात आल्या. श्रावण देवी मंदिरात हा धार्मिक कार्यक्रम अग्रवाल यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता.

पासी समाजाच्या लोकांसाठी नितीन अग्रवाल यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या ठिकाणचा व्हिडिओही समोर आला आहे. सर्वांना दारूच्या बाटल्या ठेवलेले जेवणाचे पॅकेटस वाटण्यास येथील प्रधानांना (गावचे प्रमुख) सांगितले जात होते. ही दारूच्या बाटल्या असलेली पॅकेटस कार्यक्रमाला आलेल्या अल्पवयीन मुलांनाही देण्यात आली. या मुलांनी वडिलांसह कार्यक्रमाला आल्याचे तसेच, आपल्याही ही पॅकेटस मिळाल्याचे सांगितले.

अग्रवाल या प्रकारामुळे वादात अडकले आहेत. अग्रवाल पिता-पुत्रांच्या विरोधात हरदोईचे भाजपचेच खासदार अंशुल वर्मा यांनीही भूमिका घेतली आहे. अग्रवाल यांनी मंदिरात दारूचे वाटप करून पासी समाजाचा उपहास केला आहे. यापूर्वी संसदेत त्यांनी अनेकदा चुकीची वक्तव्ये केली होती. ते सर्व विसरून त्यांना भाजपने स्वीकारले होते. पण अग्रवाल यांनी यातून कोणताही बोध न घेता चुकीचे वर्तन सुरू ठेवले आहे. त्यांना भाजपमध्ये घेण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागेल. हे प्रकरण पक्षातील वरिष्ठांच्या कानावर घातले जाईल, असा कठोर पवित्रा अंशुल वर्मा यांनी घेतला आहे.

Leave a Comment