अजित पवारांनी माझ्याविरुद्ध लढुनच दाखवावे : आढळराव पाटील

shivaji-rao
पुणे – खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्याचे संकेत देत शंभर टक्के निवडून येण्याचा विश्‍वास व्यक्त करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पलटवार केला. कुणीही माझ्यासमोर उभा राहो. शंभर टक्के नव्हे; एक हजार एक टक्के मीच निवडून येईन. निवडून नाही आलो; तर मराठ्याची अवलाद सांगणार नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

अजित पवारांनी रविवारी शिरूर मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदारसंघातून योग्य उमेदवार मिळत नसेल तर मी येथून लढायला तयार आहे. एकदा उमेदवारीचा फॉर्म भरला; तर मी शंभर टक्के निवडूनच येईल. अन्यथा पवारांची अवलाद सांगणार नाही, असे वक्तव्य करून धुरळा उडवून दिला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली होती.

या पार्श्‍वभूमीवर, खासदार आढळराव पाटील यांनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा तेवढ्याच खरपूस शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, जे जाहीर वक्तव्य अजित पवार यांनी केले, त्या मताशी त्यांनी ठाम राहावे. या मतदारसंघातून लढण्याचे त्यांचे आव्हान मी स्वीकारीत आहे. येथून त्यांनी निवडणूक लढवूनच दाखवावी. तरच त्यांना मानेल. ते माझ्या विरोधात उभे राहिले; तरी मीच निवडून येणार आणि कुणीही प्रतिस्पर्धी असला तरी विजय माझाच; अन्यथा मराठ्याची अवलाद सांगणार नाही.

मी लोकसभेच्या सलग तीन निवडणुका लढविल्या असून, खेडमधून प्रथम; तर शिरूर मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आलो आहे. मला त्या प्रत्येक निवडणुकीत पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जंग जंग पछाडले. ते प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे पर्याय अवलंबत असतात आणि स्वतःचे हसे करून घेतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लोकांचे मतपरिवर्तन करून मला रोखण्याचा अनेकदा प्रयत्न केला; पण लोक त्यांना बधले नाहीत. अजित पवारांचे वक्तव्य हे त्यांच्या पक्षातील इतर कुणी माझ्याविरोधात उभे राहायला तयार नसल्याचे सांगणारे असल्यामुळे खुद्द ते आता माझ्याविरोधात लढायला तयार झाले असतील; तर आनंदच आहे. त्यांच्याकडे योग्य पर्याय नसल्याने पवार कुटुंबीयांपैकी कुणीतरी माझ्याविरोधात येईल, अशी चर्चा होतीच, असे आढळराव म्हणाले.

Leave a Comment