होय, राष्ट्रवादीकडून मला मिळाली ऑफर; पण सध्या राजकारणात उतरण्याचा विचार नाही

ujjawal-nikam
जळगाव – जळगाव येथून विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे लोकसभा निवडणुक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण निकम यांनी सध्या राजकारणात उतरण्याचा कोणताही विचार केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मला माझ्या कुटुंबाशी तसेच माझ्या जवळच्या लोकांशी राजकारणात प्रवेश करण्याआधी चर्चा करावी लागेल असेही ते म्हणाले.

मला जळगाव येथून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तिकिटाची ऑफर दिली आहे. पण कुठल्याही राजकीय पक्षाशी माझा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी माझ्या खटल्याच्या कामात सध्या व्यस्त असल्याने अजून या संदर्भात विचार केलेला नाही. राजकारणात प्रवेश करण्याआधी मला माझ्या कुटुंबाशी तसेच माझ्या जवळच्या लोकांशी चर्चा करावी लागेल, असेही ते म्हणाले.

चोपडा येथे पत्रकार दिनानिमित्त जिल्ह्यात दोन वर्षांत झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी निकम बोलत होते. उज्ज्वल निकम यांच्या नावाची जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधानपरिषद सदस्य अरुण गुजराथी आणि उज्ज्वल निकम हे या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्व आले होते. अॅड. निकम यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी अरुण गुजराथी यांना देण्यात आली असल्याने ते व्यासपीठावर काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते.

अरुण गुजराथी यावेळी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई येथे लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक घेण्यात आली होती. जळगाव लोकसभेसाठी यावेळी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांच्या नावावर सहमती दर्शवण्यात आली. पण निकम यांच्या सहमतीनंतरच त्यांची उमेदवारी निश्‍चित करण्याचे ठरविण्यात येईल. पक्षातर्फे निकम यांच्याशी उमेदवारीबाबत चर्चा करण्याचे अधिकार मला देण्यात आले आहेत. त्यांच्यासारखी हुशार व्यक्ती राजकारणात आल्यास जनतेला याचा फायदा होईल, असेही गुजराथी म्हणाले. रावेर मतदारसंघात तुमच्या नावाबद्दल चर्चा आहे, याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, दोन्ही पक्षांची आघाडी होणार आहे. परंतु, जर दोन्ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्या तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझे नाव सुचवले तर नक्कीच मी निवडणूक लढवेल, असेही ते म्हणाले.

Leave a Comment