एमआयएमच्या हंगामी अध्यक्षांकडून शपथ घेण्यास भाजप आमदाराचा नकार

raja-singh
तेलंगणा विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे आमदार राजा सिंह यांच्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन या पक्षाच्या हंगामी विधानसभा अध्यक्षांकडून शपथ घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.

एमआयएमचे आमदार मुमताज अहमद खान यांची दोन दिवसांपूर्वी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. मात्र त्यांच्यासमोर आमदारपदाची शपथ घेण्यास टी. राजा सिंह यांनी नकार दिला आहे. “ज्यांचा एमआयएम हा पक्ष हिंदूंना संपविण्याचा प्रयत्न करत आहे, जे वंदे मातरम गात नाहीत आणि ‘भारत माता की जय’ म्हणण्यास ज्यांचा आक्षेप आहे त्यांच्यासमोर शपथ घेण्यास मी नकार देतो,” असे त्यांनी म्हटले आहे.

राजा सिंह हे कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या महिन्यात झालेल्या तेलंगाणा विधानसभा निवडणुकीत गोशामहल मतदारसंघांतून ते टीआरएसचे प्रेमसिंग राठोड यांचा पराभव करून निवडून आले होते. या निवडणुकीत विजयी झालेले ते भाजपचे एकमेव आमदार आहेत.

राजा सिंह हे यापूर्वी गोहत्येबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. तसेच निवडणुकीत आमचा पक्ष जिंकल्यास हैद्राबादचे नाव भाग्यनगर करू, असे आश्वासन त्यांनी दिले होते.

Leave a Comment