सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित, भारताने मालिका 2-1 ने जिंकली

team-india
सिडनी – सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेला ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या दरम्यान चौथा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला असून भारताने ४ कसोटी सामन्यांची ही मालिका २-१ ने जिंकली. भारताचा ७० वर्षांत ऑस्ट्रेलियातील हा पहिलाच मालिका विजय ठरला आहे. मालिकेत ३ शतके ठोकत ५२१ धावा करणाऱ्या पुजाराला सामनावीर आणि मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आले.

ऑस्ट्रेलियाच्या भूमीमध्ये ज्या कामगिरीची वाट 1947 सालापासून भारतीय संघ पाहत होता, अखेर तो दिवस आज उजाडला आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा भीमपराक्रम विराट सेनेने केला आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 च्या फरकाने विजयी झाला आहे. सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवसात भारताला विजयाची चांगली संधी होती. मात्र अंधुक प्रकाश आणि पावसाने भारताच्या इराद्यावर पाणी फिरवले. अखेर दोन्ही पंचांनी खेळपट्टीची पाहणी करुन दोन्ही कर्णधारांच्या संमतीने सामना अनिर्णीत घोषित केला.

तत्पूर्वी, ३०० धावांवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव आटोपल्यामुळे त्यांच्यावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. पहिल्या डावात सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि मार्कस हॅरिस या जोडीने सावध सुरुवात करत संघाला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. पण त्यानंतर उस्मान ख्वाजा (२७) बाद झाला. दुसऱ्या सत्रात खेळपट्टीवर स्थिरावलेला हॅरिसदेखील बाद झाला. त्याने ७९ धावा केल्या. पाठोपाठ शॉन मार्श ८ धावांवर बाद झाला. चांगली सुरूवात मिळालेला लॅबसचेंज ३८ धावा करून माघारी परतला. नंतर ट्रेव्हिस हेड २० धावा करून बाद झाला. तर तिसऱ्या सत्रात पहिल्याच षटकात कर्णधार टीम पेन (५) तंबूत परतला. चौथ्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर यजमानांनी ३ गडी झटपट गमावले. कमिन्स (२५), हँड्सकॉम्ब (३७) आणि लॉयन (०) हे पाठोपाठ बाद झाले. शेवटच्या जोडीने चांगली झुंज दिली पण कुलदीपने ती जोडी फोडत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० वर संपवला. कुलदीपने सर्वाधिक ५, जाडेजा आणि शमीने प्रत्येकी २ तर बुमराहने १ बळी टिपला. पहिल्या डावात भारताने ३२२ धावांची आघाडी घेतली.

Leave a Comment