सिमेंटची भिंत नव्हे, अमेरिका उभारेल स्टीलचे अडथळे – डोनाल्ड ट्रम्प

donald-trump
मेक्सिकोच्या सीमेजवळ भिंत बांधण्याचा हट्ट धरलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एक पाऊल मागे आले आहेत. या सीमेजवळ काँक्रीट भिंतीऐवजी स्टीलचे अडथळे बांधण्याची अमेरिकेची योजना आहे, असे ट्रम्प यांनी रविवारी सांगितले.

”आम्ही आता स्टीलचे अडथळे उभारण्याची योजना आखत आहोत. ते मजबूत असतील आणि कमी गुंतागुंतीचेही असतील. हा एक उत्तम उपाय असून अमेरिकेतच बनविलेले असेल,” असे ट्रम्प म्हणाले. या मुद्द्यावर सरकार आणि विरोधी डेमोक्रॅटिक पक्षामधील मतभेद संपुष्टात येत असल्याचे संकेत त्यांनी दिले. या मुद्द्यावरून गेली 15 दिवस अमेरिकेत सरकारचे कामकाज ठप्प झाले आहे.

अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी सीनेट सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी आणि सीनेटमधील विरोधी पक्षनेते चक श्यूमर यांच्यासह अमेरिकी काँग्रेसमधील डेमोक्रेटिक नेत्यांशी रविवारी चर्चा केली. ही बैठक परिणामकारक झाल्याचे ट्रम्प म्हणाले.

“आम्ही अनेक लोकांशी संपर्क केला आहे आणि मी माझ्या लोकांना हे सांगण्यास सांगितले की आम्ही स्टीलचा अडथळा उभारू. हे करण्यासाठी आमच्या महान कंपन्या सक्षम आहेत,” असे ट्रम्प यांनी कॅम्प डेव्हिड येथून परत आल्यावर व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले.

आपले विरोधक डेमोक्रॅट्सना मेक्सिकोच्या सीमेवर ठोस भिंतीचा पर्याय आवडत नाही, म्हणून आपण स्टीलची ऑफर दिली आहे, असे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्या स्थलांतरितांचे लोंढे रोखण्यासाठी अमेरिका- मेक्सिको सीमेवर एक ठोस अडथळा आवश्यक आहे, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment