नयनतारा सहगल यांना माझा अथवा माझ्या पक्षाचा विरोध नाही: राज ठाकरे

raj-thakre
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यावरुन सुरु असलेल्या वादावर भूमिका स्पष्ट केली असून जर संमेलनात नयनतारा सहगल यांच्या सारख्या ज्येष्ठ लेखिका येणार असतील आणि जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा त्यांच्यासमोर खुली होणार असेल आणि जर ही परंपरा त्या जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेत एक वाहक असतील तर माझा अथवा माझ्या पक्षाचा आक्षेप असायचे कारणच नसल्याचे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

दरम्यान नयनतारा सहगल यांना संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी पत्र पाठवून उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण रद्द करीत असल्याचे कळवले. काही स्थानिक संघटनांनी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत संमेलन उधळण्याचा इशारा दिला होता. यात मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर ट्विटरवरुन भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे म्हणतात, जी मराठी संस्कृतीची महत्त्वाची शक्तिस्थळे आहेत, त्यात मराठी साहित्य हे महत्त्वाचे शक्तिस्थळ आहे. एखाद्या भाषेतील साहित्याचा उत्सव साजरा करण्यासाठी त्यावर मंथन करण्यासाठी साहित्य संमेलन न चुकता भरवण्याची परंपरा बहुदा फक्त महाराष्ट्रातच असावी, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील मराठी साहित्य संमेलनाचे मराठीपण जपले जावे अशी माझ्या सहकाऱ्याची भूमिका आहे, जी योग्य देखील आहे. पण नयनतारा सेहगल यांच्या सारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल आणि त्या जर ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेत एक वाहक असतील तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचे कारणच नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आमचा नयनतारा सहगल यांना विरोध नाही, त्यांनी जरुर यावे, त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment