उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष पुरेसे मजबूत असून त्यांना काँग्रेससारख्या नगण्य शक्तीची गरज नाही, असा निर्वाळा समाजवादी पक्षाने दिला आहे. सप आणि बसपच्या युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नगण्य, युतीसाठी गरज नाही – समाजवादी पक्षाचा निर्वाळा
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरणमोय नंदा यांनी रविवारी ही स्पष्टोक्ती केली. बसपप्रमुख मायावती आणि सपचे नेते अखिलेश यादव यांची शुक्रवारी नवी दिल्ली येथे बैठक आयोजित झाली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी जागावाटप जवळजवळ निश्चित केल्याचे सांगितले जाते. त्या पार्श्वभूमीवर नंदा यांनी हे वक्तव्य केले आहे.
मात्र यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघांत हे पक्ष उमेदवार देणार नाहीत, असे संकेतही नंदा यांनी दिले.
“उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस ही एक नगण्य शक्ती आहे. त्यामुळे त्या पक्षाला सामील करण्याचा किंवा वगळण्याचाही विचार आम्ही करत नाही आहोत. भाजपशी मुकाबला करणारी सप-बसप युती ही मुख्य शक्ती असेल. काँग्रेस एक किंवा दोन जागांवर लढू शकेल. आपण कोणत्या स्थितीत असावे, याचा निर्णय काँग्रेसने घ्यायचा आहे,” असे नंदा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला मुलाखतीत सांगितले.
काँग्रेस मजबूत असलेल्या राज्यांमध्ये आपल्या सहकारी पक्षांसाठी एकही जागा सोडू इच्छित नाही, मात्र जिथे तो दुर्बळ आहे तिथे त्याला स्वतःचा वाटा हवा असतो. त्यामुळे काँग्रेसला युतीच्या राजकारणाचा मंत्र शिकण्याची गरज आहे, असे मतही नंदा यांनी व्यक्त केले.