मुलींना सोशल मीडियाचा अतिरेक डिप्रेशनसाठी कारणीभूत

social-media
लंडन : एका अभ्यासातून सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या लहान मुलींना डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा धोका जास्त असल्याचे समोर आलेय. डिप्रेशनसाठी मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचा अतिरेक कारणीभूत ठरु शकतो असा दावा लंडन कॉलेज विद्यापीठाच्या अभ्यासातून करण्यात आला आहे. शिवाय कमी सोशल मीडिया वापरण्याचा सल्लाही मुलींना देण्यात आला आहे.

सोशल मीडियावर दिवसातील पाच तासांपेक्षा जास्त वेळ घालवणाऱ्या 40 टक्के मुलींमध्ये डिप्रेशनची लक्षणे दिसून आली आहेत. तर मुलांमध्ये हेच प्रमाण 15 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. 14 वर्ष वयोगटातील 11 हजार मुलींचा संशोधकांनी अभ्यास केला आहे. मुलींमध्ये सोशल मीडियाचा वापर आणि डिप्रेशनची लक्षणे यांचा संबंध मुलांच्या तुलनेत जास्त आहे. जेवढा वेळ मुली सोशल मीडियावर जास्त घालवतात, तेवढे डिप्रेशन अधिक वाढते. मुलांच्या बाबतीत, जे दिवसाचा तीन तास किंवा अधिक वेळ सोशल मीडियावर असतात, त्यांच्यात नैराश्याची अधिक लक्षणे दिसतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.

संशोधकांनी या अभ्यासात सोशल मीडिया आणि डिप्रेशन यांच्यातील संबंधाची कारणे समजून घेण्याचा प्रयत्नही केला. 40 टक्के मुलींना ऑनलाईन राहण्याच्या सवयीमुळे झोपही लागत नाही. तर हाच आकडा मुलांच्या बाबतीत 28 टक्के आहे. मुलींच्या बाबतीत इंटरनेटवरून छळणूक होण्याचे प्रकार जास्त असल्यामुळेही नैराश्य येत असल्याचे समोर आले आहे.