असंतुष्ट ग्राहकाची गुगलच्या विरोधात पोस्टरबाजी

google
गुगलच्या अत्यंत महागड्या पिक्सेल फोनमधील बिघाड आणि ग्राहक सेवेच्या अनुभवाने नाराज झालेल्या एका भारतीय ग्राहकाने निषेधाचा अभिनव मार्ग स्वीकारला. या ग्राहकाने राजधानी दिल्लीत गुगलच्या विरोधात पोस्टरबाजी केली.

हरयाणातील मनु अगरवाल या ग्राहकाने ही शक्कल लढविली. अगरवाल यांनी पहिल्या पिढीतील पिक्सेल स्मार्टफोन विकत घेतला होती. हा फोन त्यांनी 2017 साली घेतला होता, मात्र काही दिवसांतच त्यांच्या फोनमध्ये अडचणी येऊ लागल्या. त्यांनी या संबंधात गुगलच्या ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रार केली. तेथे या फोनची अनेकवेळा दुरूस्ती करण्यात आली, तरीही समस्या कायम राहिली.

आपली नाराजी अगरवाल यांनी ट्विटरवरही व्यक्त केली होती. अग्रवाल यांनी त्याने या विषयावरील ट्वीटमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचई आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले होते. इतर ग्राहकांप्रमाणे गुगलने त्यांनाही या समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे अगरवाल नाराज होते. हा मानसिक छळ असल्याचे त्यांनी म्हटले होते.

अखेर अगरवाल यांनी दिल्लीत बॅनर लावून गुगलचे वाभाडे काढले. लोकांनी गुगलचे कोणतेही उत्पादन विकत घेऊ नये, असे त्यांनी बॅनरवर म्हटले होते. दिल्लीतील काही प्रमुख ठिकाणी बॅनर ठेवण्यात आले होते. त्यातील काही कनॉट प्लेसमध्ये आढळून आले होते, असे इंडिया टुडेने म्हटले आहे.

इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या कारवरही गुगलचा निषेध करणारा फलक लावला होता. या बॅनर आणि फलकांवर एक क्यूआर कोड असून त्याची लिंक त्याच्या ट्वीटला दिली होती.

Leave a Comment