वेळ पडल्यास कित्येक वर्षे सरकार बंद ठेवू – ट्रम्प

donald-trump
मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेत सरकारी कामकाज ठप्प झाले आहे. या भिंतीसाठी निधी मिळाला नाही, तर सरकारी कामकाज कित्येक महिने किंवा वर्षेही बंद ठेवू, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षात वाद निर्माण झाल्यामुळे 22 डिसेंबरपासून अमेरिकेत शटडाऊन झाले आहे. त्यामुळे सरकारी कामकाज बंद पडले असून केंद्र सरकारच्या 800,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पगाराविना काम करावे लागत आहे.

ही कोंडी फोडण्यासाठी शुक्रवारी ट्रम्प व डेमोक्रॅट नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ट्रम्प यांनी ही धमकी दिली. तसेच अशी धमकी दिल्याचे त्यांनी मान्यही केले.

“मी नक्कीच तसे म्हणालो,” असे ट्रम्प म्हणाले. तसेच असे होईल असे मला वाटत नाही ते होईल पण मी त्यासाठी तयार आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

अमेरिकेचे सरकारी कामकाज ठप्प झाल्यामुळे प्रभावित झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

अमेरिकी संसदेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटिटिव्ह्जमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे. त्यामुळे ही कोंडी लवकरच फुटण्याची फारशी शक्यता नाही, असे निरीक्षकांचे मत आहे.

Leave a Comment