चीनविरोधात आम्हाला मदत करा – तैवानच्या अध्यक्षांचे जगाला आवाहन

taiwan
आमच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने आम्हाला मदत करावी, अशी आर्त हाक तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी शनिवारी दिली. चीन सरकार जाणूनबुजून आमच्याशी चर्चा करण्यास टाळाटाळ करून आमच्या लोकशाहीचा उपमर्द करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तैवान आणि चीनचे एकीकरण होण्याची गरज अधोरेखित करून त्यासाठी प्रसंगी बळाचा वापर करू, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी बुधवारी म्हटले होते. त्याला उत्तर म्हणून त्साई यांनी हे आवाहन केले आहे.

त्साई या 2016 मध्ये सत्तेवर आल्या होत्या. तेव्हापासून चीन आणि तैवान यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. तैवान हा चीनचा एक भाग असल्याची चीनची भूमिका आहे तर त्साई यांचा त्याला विरोध आहे. बीजिंगने तैवानशी संपर्क एकतर्फी तोडला असून त्याच्याभोवती लष्करी कवायती केल्या आहेत.

“आम्ही चिथावणी देण्यापासून आणि गैरसमजांपासून दूर राहण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत असताना चीनची कृत्ये त्याच्याशी विसंगत आणि लोकशाही पद्धतीच्या विरोधात आहेत,” असे शनिवारी परदेशी माध्यमांशी संवाद साधताना त्साई म्हणाल्या.

“जर आंतरराष्ट्रीय समुदाय या परिस्थितीत तातडीने बोलण्यास असमर्थ ठरला आणि तैवानलामदत करण्यात कमी पडला, तर पुढचा क्रमांक कोणत्या देशाचा लागेल याची मला चिंता वाटते,” असे त्या म्हणाल्याचे एएफपी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

Leave a Comment