वारंवार तोंड येत असल्यास आजमावा हे उपाय

mouth
पचनक्रिया व्यवस्थित नसेल, किंवा शरीरामध्ये काही कारणाने उष्णता वाढली असेल, तर वारंवार तोंड येऊ लागते. यालाच ‘माऊथ अल्सर्स’ असे ही म्हटले जाते. अनेकदा काही कारणासाठी घेतलेली औषधे उष्ण पडल्यानेही तोंड येऊ शकते. तोंड आले असता काही खाणे-पिणे कठीण होऊन बसते. जिभेवर बारीक फोड येतात आणि क्वचित वेदनाही होतात. बहुतेकवेळी बी कॉम्प्लेक्स घेतल्याने माऊथ अल्सर्स थोड्याच अवधीत बरे होतात. त्याच्या जोडीने काही घरगुती उपायांचा अवलंब करूनही हे माऊथ अल्सर्स बरे करता येऊ शकतात.
mouth1
तुळस स्वास्थ्यवर्धक असून, यामध्ये वेदनाशामक गुण आहेत. तसेच शरीरातील उष्णता कमी करण्यासही तुळस सहायक आहे. तोंड आले असता दिवसातून तीन ते चार वेळा तुळशीची पाने चावून खाल्ल्याने आराम मिळतो. जर पचनक्रिया सुरळीत नसल्याने शरीरातील उष्णता वाढून तोंड आले असले, तर ते बरे करण्यासाठी खसखस उपयुक्त ठरते. थोडी खसखस चावून खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तोंडातील अल्सर्स लवकर निवळतात.
mouth2
नारळाचे तेल आणि नारळाचे पाणी हे दोन्ही तोंडातील अल्सर ठीक करण्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. नारळाच्या पाण्याने शरीरातील उष्णता दूर होत असून, नारळाचे तेल तोंडात धरून चूळ भरल्याप्रमाणे खुळखुळविल्यानेही तोंडातील अल्सर ठीक होण्यास मदत होते. याला ‘ऑईल पुलिंग’ म्हटले जाते. जिथे अल्सर आहेत त्यावरून नारळाचा चव लावल्यानेही तोंडातील अल्सर बरे होतात. त्याचप्रमाणे ज्येष्ठमधाच्या पुडीमध्ये थोडासा मध घालून तोंडामध्ये आणि जिभेवर लावल्यास अल्सर ठीक होतात.