मद्यसम्राट विजय माल्ल्या फरार आर्थिक गुन्हेगार घोषित

vijay-mallya
नवी दिल्ली – मुंबईतील न्यायालयाने शनिवारी भारतातील अनेक बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून ब्रिटनमध्ये पसार झालेला मद्यसम्राट विजय माल्ल्या याला अखेर फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे. माल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार न्यायालयाने घोषित केल्यामुळे त्याची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरोपी मोठे आर्थिक घोटाळे, बँकांची फसवणूक यांसारखे मोठे आर्थिक गुन्हे उघडकीस आल्यानंतर परदेशामध्ये पलायन करून तिथे आश्रय घेतात. त्यांचे अशा देशांकडून प्रत्यार्पण होणे, त्यानंतर खटले चालविणे यामध्ये खूप वेळ वाया जातो. अशा घोटाळेबाजांवर वचक निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने ‘फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८’ आणला आहे. फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून या कायद्याअंतर्गत जाहीर झाल्यास गुन्हेगाराच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

विजय माल्ल्या भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये पसार झाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माल्ल्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून माल्ल्याची मालमत्ता ईडीला जप्त करायची आहे. ईडीने यासंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. शनिवारी या अर्जावर निकाल दिला. माल्ल्याला फरारी आर्थिक गुन्हेगार न्यायालयाने जाहीर केल्याने ईडीला माल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार मिळाला आहे.

Leave a Comment