भारतातून नेलेल्या सिंहीणीवर प्रागमध्ये कृत्रिम रेतनाचा प्रयोग

lioness
चेक गणराज्याची राजधानी प्राग येथे भारतातून नेलेल्या सिंहीणीवर कृत्रिम रेतनाचा प्रयोग करण्यात आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच केलेल्या या प्रयोगामुळे आशियायी सिंह या दुर्मिळ प्रजातीच्या संवर्धनाची आशा निर्माण झाली आहे.

प्राग येथे असलेल्या प्राणिसंग्रहालयात हा प्रयोग करण्यात आला आहे. आधी या सिंहीणीची जोडी दोन सिंहांशी जमवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र त्यात यश न आल्यामुळे कृत्रिम रेतनाचा मार्ग चोखाळण्यात आला. “भारतातील गुजरातमधून आणलेली आमची सिंहीण जिनी हिच्यावर बुधवारी अधिकृतपणे कृत्रिम रेतनाचा प्रयोग करण्यात आला,” असे या प्राणिसंग्रहालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भारतात आशियायी सिंह या प्रजातीचे केवळ 600 सिंह उरले आहेत, तर युरोपीय प्राणिसंग्रहालय आणि अन्य ठिकाणी केवळ 143 सिंह उरले आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर घटणाऱ्या सिंहांच्या संवर्धनासाठी प्रागच्या आशियायी सिंहांकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत, असे या प्राणिसंग्रहालयाचे संचालक मिरोस्लाव्ह बोबेक यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले.

या प्राणिसंग्रहालयात भारतातून 2015 मध्ये तीन सिंह नेण्यात आले होते. मात्र या सिंहीणीला गर्भवती करण्यात सर्व सिंह अपयशी ठरले. बर्लिनमधील लाईबनित्झ इन्स्टिट्यूट फॉर झू अँड वाईल्डलाईफ रिसर्चमधील एक चमू आणि प्राग प्राणिसंग्रहालयाच्या पशुवैद्यकांनी मिळून ही प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे जामवान या सिंहाचे वीर्य वापरून कृत्रिम रेतन करण्याचे प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी ठरविले. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास चार महिन्यांत पिले जन्मतील. या प्रयोगाची यशाची शक्यता 60-70 टक्के असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment