100 कौरवांचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीमुळेच – नागेश्वर राव

nageshwar-rao
हैद्राबाद- आंध्र विद्यापीठाचे कुलगुरु नागेश्वर राव यांनी कौरवांचा जन्म स्टेम सेल आणि टेस्ट ट्यूब बेबीने झाला असल्याचा दावा केला आहे. त्यांनी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या व्यासपीठावर बोलताना भारताला हे ज्ञान खूप दिवसांपासून अवगत असल्याचेही म्हटले आहे.

नागेश्वर राव यावेळी म्हणाले की, शंभर मुलांना एक महिला तिच्या आयुष्यात जन्म देऊ शकत नसल्यामुळे स्टेम सेल थेरपी आणि टेस्टटय़ूब बेबी अशी तंत्रे वापरून गांधारीने मुलांना जन्म दिला. यावर विश्वास ठेवायला हवा. आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वी स्टेम सेलवरील संशोधन झाले होते. पुष्पक विमान फक्त रावणाकडे नव्हते तर 24 वेगवेगळ्या प्रकारची विमाने होती. अनेक विमानतळ लंकेत असल्याचा दावाही त्यांनी केला. आंध्र प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरू जी. नागेश्वर राव यांनी कौरवांचा जन्म हा टेस्ट टय़ूब बेबी तंत्रातून झाला. विष्णूचे दहा अवतार म्हणजे डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. विष्णूचे सुदर्शन चक्र हे गाइडेड मिसाइल आहे. रावणाची 24 विमाने आणि विमानतळ होते, अशी विधाने करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

डॉ. कानन कृष्णन यांनीही याचवेळी पौराणिक संदर्भाची री ओढली. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी गेल्या विज्ञान काँग्रेसमध्ये वेद हे आईनस्टाईनच्या सिद्धांतापेक्षा श्रेष्ठ होते, अशा आशयाचे विधान केले होते ते योग्यच होते असे डॉ. कृष्णन म्हणाले. मोदी सरकारने ‘लिगो’ प्रकल्प मंजूर केल्यामुळे ग्रॅव्हीटेशनल वेव ऐवजी नरेंद्र मोदी वेव असे नामकरण करावे, असे वक्तव्यही त्यांनी केले.