राहुल गांधींनी जानवे केवळ तीन राज्यांसाठी घातले होते का – स्मृती इराणींचा सवाल

smriti-irani
राम मंदिर प्रकरणात काँग्रेस न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा आणण्याचा आरोप करतानाच राहुल गांधींनी जानवे केवळ तीन राज्यांसाठी घातले होते का, असा सवाल केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी केला. रामभक्तांनी काँग्रेसला याचा जाब विचारला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

इराणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर आल्या होता. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संपर्क साधला. ज्येष्ठ काँग्रेस नेते व वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात राम जनमभूमी-बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच घेण्याची मागणी केली होती. त्याचा संदर्भ इराणी यांनी दिला.

“राम मंदिर प्रकरणात काँग्रेसने आपल्या वकीलांद्वारे राजकारण केले आहे. पक्षाचे नेते वकील म्हणून न्यायालयात अडथळा निर्माण करीत आहेत. जनतेने आणि राम भक्तांनी पक्षाला विचारले पाहिजे, की काँग्रेसच्या नेत्याने जानवे केवळ तीन राज्यांच्या निवडणुकीसाठी घातले होते का,” असे त्या म्हणाल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

राहुल यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत इराणी यांचा पराभव केला होता. येत्या निवडणुकीतही हे दोन समोरासमोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment