हेल्मेट न घालणाऱ्या १८२ दुचाकीस्वारांना मागील वर्षी गमावावा लागला जीव

helmet
पुणे – हेल्मेट न घालणाऱ्या १८२ दुचाकीस्वारांना मागील वर्षी आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर दुचाकीस्वारांनी केल्यास अपघातामध्ये डोक्‍याला मार बसण्याचे प्रमाण कमी होऊन मृत्यू व जखमींचे प्रमाणही घटेल, असा विश्‍वास वाहतूक विभागाचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

वेगवेगळ्या कारणांमुळे दुचाकीस्वार हेल्मेट घालण्याचे टाळतात. भरधाव वाहन चालविल्यामुळे अथवा रस्त्याच्या कडांवरून दुचाकी घसरूनही अपघात होतात. दुचाकीस्वारांना बहुतांश अपघातांमध्ये सर्वाधिक फटका बसत असल्याचे चित्र आहे. धडक बसल्यानंतर दुचाकीस्वार डाव्या किंवा उजव्या बाजूला पडतात. त्यामुळे दुचाकीस्वार पहिल्यांदा डोके रस्त्यावर आपटून गंभीर जखमी होतो. काहीवेळा डोक्‍याला खरचटलेले असते, प्रत्यक्षात मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू होतो.

दुचाकीस्वाराला दुचाकी व समोरील वाहन भरधाव असल्यास अपघात होऊन जीव गमवावा लागतो. रस्ता दुभाजक किंवा रस्त्याकडेला असणाऱ्या एखाद्या वस्तूवर डोके आपटून दुचाकीस्वारांचा अपघातामध्ये मृत्यू होत असल्याची सद्यःस्थिती आहे. दुचाकीस्वारांनी विशेषतः शहरातील व शहरालगतचे रस्ते, महामार्ग, मोठे रस्ते, धोकादायक वळणांवर झालेल्या अपघातांमध्ये हेल्मेट न घातल्यामुळे त्यांनी जीव गमावल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक पोलिस दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचे आवाहन करीत आहेत.

Leave a Comment