
मुजफ्फरनगर – वादग्रस्त वक्तव्य करत भाजपचे आमदार विक्रम सैनी यांनी खळबळ उडवून दिली असून देशात ज्या लोकांना असुरक्षित असल्याची भावना आहे, तसेच आपल्याला धमकावले जात असल्याचे वाटत आहे अशा लोकांना बॉम्बने उडवले पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरचे विक्रम सैनी आमदार आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता नसरुद्दीन शाह यांनी देशात असुरक्षित वातावरण असल्याचे वक्तव्य केले होते. विक्रम सैनी यांनी त्यांच्या या वक्तव्यावर नाव न घेता टीका केली आहे.
मला मंत्रीपद द्या, मी भारतात असुरक्षित असे ज्यांना वाटते त्यांना बॉम्बने उडवून टाकेन
भारतात ज्यांना असुरक्षित तसेच धमकावले जात असल्याचे वाटते अशा लोकांना बॉम्बने उडवले पाहिजे. मंत्रीपद मला द्या मी अशा लोकांना बॉम्बने उडवून टाकेन. एकालाही सोडणार नसल्याचे विक्रम सैनी यांनी म्हटले आहे. देशात धोका आहे, किंवा येथे सुरक्षित नाही असे जे लोक म्हणतात ते देशद्रोही असल्याचेही विक्रम सैनी यांनी म्हटले आहे. अशा लोकांसाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. त्यांच्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज असून, त्याअंतर्गत शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अशा लोकांना देशद्रोही श्रेणीत टाकले पाहिजे.
