श्रीलंकन महिलेचा शबरीमला मंदिरात प्रवेश

sabarimala
पंबा – ४६ वर्षीय श्रीलंकन महिलेने शबरीमला मंदिरात प्रवेश केला. पण अय्यप्पा मंदिराच्या पायऱ्या चढून तिला आत जाऊ दिले नाही, असे महिलेने सांगितले. मंदिरात जाण्याआधी तिने पोलिसांना कळविले होते. तसेच, तिने यावेळी मेनॉपॉजचे (वयोमानानुसार मासिक पाळी बंद झाल्याचे) वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले होते. तरीही मंदिरात जाऊ न दिल्याचे सांगत या महिलेने निराशा व्यक्त केली.

बिंदू आणि कनकदुर्गा या चाळीशीतील दोन महिला भाविकांनी याआधी बुधवारी शबरीमला अय्यप्पा मंदिरात पहाटे ३.४५ वाजता प्रवेश केला होता. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी पत्रकार परिषदेत शबरीमला मंदिरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येक महिलेला आवश्यक सुरक्षा पुरवण्याचे स्पष्ट आदेश पोलिसांना दिले होते, असे सांगितले होते.

केरळमध्ये या घटनेनंतर हिंसाचार भडकला होता. यात झालेल्या दगडफेकीत शबरीमला कर्मा समितीच्या एका कार्यकर्त्याचाही मृत्यू झाला. बहुतांशी हल्ले महिला, पोलीस, पत्रकारांवर चढवण्यात आले. पोलिसांच्या ७ गाड्या, ७९ राज्य परिवहन निगमच्या (केएसआरटीसी) बसेसची तोडफोड करण्यात आली. मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी यानंतर सरकार आपली संवैधानिक जबाबदारी पूर्ण करत आहेत. शबरीमलाला संघ परिवार हिंसक स्थळात रूपांतरित करू पाहत असल्याचा आरोप केला होता.

Leave a Comment