‘पाकिस्तानच्या मदर तेरेसां’च्या कबरीवर क्यूआर कोडचा वापर

QR-code
एखाद्या विषयाच्या किंवा सेवेची लिंक देण्याकरिता क्यूआर कोडचा वापर आता सर्रास होऊ लागला आहे. मात्र पाकिस्तानात एका कबरीवर क्यूआर कोडचा वापर करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या मदर तेरेसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. रूथ फाऊ यांच्या कबरीवर हा प्रयोग करण्यात आला आहे. डॉ. रूथ या प्रसिद्ध मानवतावादी होत्या आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या संस्थापक होत्या. त्यांनी रूग्णाच्या सेवेत 55 वर्षे व्यतीत केली होती. त्यांची कबर कराचीतील गोरा स्मशानभूमीत असून त्यांच्या कबरीवर हा कोड वापरण्यात आला आहे. या कबरीला भेट देणाऱ्या व्यक्ती हा क्यूआर कोड स्कॅन करून डॉ. रूथ यांची माहिती मिळवू शकतील. पाकिस्तानातील पहिली इलेक्ट्रॉनिक कबर असे या कबरीला संबोधण्यात येत आहे.

डॉक्टर रूथ फाऊ या मूळ जर्मनीच्या होत्या. त्या 1960 मध्ये सर्वप्रथम पाकिस्तानमध्ये आल्या होत्या. येथील कुष्ठरोग्यांची हलाखीची परिस्थिती पाहून त्यांनी कुष्ठरोग्यावर उपचार करण्यासाठी कायमस्वरूपी पाकिस्तानमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे निधन 12 ऑगस्ट 2017 रोजी झाले होते. त्यांना पाकिस्तानच्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हिलाल-ए-इम्तियाज 1979 मध्ये तर हिलाल-ए-पाकिस्तान 1989 मध्ये देण्यात आला होता.

Leave a Comment