पदाची शपथ घेतलेल्या महापौराची केवळ दोन तासांत हत्या!

mexico
आपल्या पदाची शपथ घेतलेल्या महापौराची केवळ दोन तासांत हत्या करण्यात आल्याची घटना मेक्सिकोत घडली आहे. विशेष म्हणजे या घटनेचे थेट प्रक्षेपण त्यांच्या फेसबुक पेजवरून झाले.

अलेजांद्रो अपारिसियो यांनी मंगळवारी मेक्सिकोतील ओक्साका या शहराचे नवीन महापौर म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी सूत्रे घेतल्यानंतर दोन तासांपेक्षाही कमी वेळेत त्यांची हत्या झाली, असे सरकारी अधिवक्त्यांनी बुधवारी सांगितले.

शपथ घेतल्यानंतर अपारिसियो हे त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत सिटी हॉलमध्ये बैठकीला जात होते. त्यावेळी एका मनुष्याने त्यांच्यावर गोळीबार केला. अपारिसियो आणि अन्य तीन जणांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत जाहीर करण्यात आले, असे अटॉर्नी जनरल कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. गोळीबारात झालेल्या जखमांमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचे निधन झाले, असे डॉक्टरांनी म्हटले आङे.

या घटनेत जखमी झालेल्या अन्य एका अधिकाऱ्याचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. तसेच जखमी झालेल्या दोन अन्य अधिकाऱ्यांवर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अपारिसियो हे मंगळवारी शहरातील अनेक कार्यालयांचा करत होते आणि गोळीबार होत असताना ते समर्थकांच्या घोळक्यात होते. त्याच्या फेसबुक पेजवरील लाईव्ह प्रक्षेपणात हल्ला झाल्यानंतर सुमारे डझनभर लोक त्यांच्या अवतीभोवती गोंधळलेल्या अवस्थेत दिसतात. अन्य काही जणांनी कथित हल्लेखोराला धरून ठेवले. या व्यक्तीचे नाव केवळ जे. एम. व्ही. एवढेच सांगण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.