चीनमधील मंदीमुळे अॅपलला 55 अब्ज डॉलर्सचा फटका!

apple
अनेक दशकांच्या वाढीनंतर चीनची अर्थव्यवस्था मंद पडत असून 1990 पासूनचा हा सर्वात कमी वाढीचा दर आहे. मात्र यामुळे अॅपल कंपनीला फटका बसला असून कंपनीला शेअर बाजारात 55 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे.

चीनमधील मंदी तसेच अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या चीनच्या व्यापार युद्धामुळे अॅपलच्या गुंतवणूकदारांनी कमी महसूल मिळण्याची अपेक्षा बाळगावी, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी बुधवारी गुंतवणूकदारांना पाठविलेल्या पत्रात लिहिले आहे. हे पत्र जाहीर करण्यापूर्वी काही तास आधी कंपनीच्या शेअरची विक्री थोड्या वेळासाठी थांबविण्यात आली होती. ही विक्री पुन्हा सुरू झाल्यानंतर शेअरचे भाव 8 टक्क्यांनी कमी झाले. त्यामुळे कंपनीच्या शेअर बाजारातील मूल्यात 55 अब्ज डॉलर्सची घट झाली.

चीनची बाजारपेठ ही अॅपलच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत असून अॅपलचे गुंतवणूकदार यामुळे चिंताग्रस्त आहेत, असे सीएनएन वाहिनीने म्हटले आहे. अॅपलसाठी चीन ही एक मोठी बाजारपेठ असून कंपनीचा जगभरातील उत्पन्नाचा 15 टक्के वाटा चीनमधून येतो.

“आम्ही महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये काही आव्हाने असल्याचे गृहित धरले होते. मात्र खासकरून ग्रेटर चीनमध्ये आर्थिक मंदीची तीव्रता आम्ही लक्षात घेतली नव्हती,” असे कूक यांनी पत्रात लिहिले आहे.

अॅपलला डिसेंबरमध्ये संपलेल्या तीन महिन्यांत 89 अब्ज डॉलर्स ते 93 अब्ज डॉलर्स महसूल मिळण्याची अपेक्षा होती. मात्र ती कमी करून 84 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आणण्यात आली आहे.