काँग्रेसशी युतीच्या शक्यतेमुळे ‘आप’च्या नेत्याचा राजीनामा

HS-Phoolka
दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे नेते आणि 1984च्या शीखविरोधी दंगलीची कायदेशीर लढाई लढणारे ज्येष्ठ नेते एच. एस. फुलका यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फुलका यांनी गुरुवारी ट्वीट करून या निर्णयाची माहिती दिली.

येत्या मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ‘आप’मध्ये युती होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर फुलका यांनी हा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन या निर्णयामागचे कारण सांगेन, असे फुलका यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

‘‘मी आपमधून राजीनामा दिला असून आज केजरीवाल यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. त्यांनी मला राजीनामा न देण्यास सांगितले मात्र मी माझ्या निर्णयावर कायम आहे. उद्या सायंकाळी चार वाजता दिल्लीतील रायसीना रोडवरील प्रेस क्लबमध्ये मी माध्यमांना आप सोडण्याचे कारण आणि पुढच्या योजनांची माहिती देईन,’’ असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेससोबतच्या युतीच्या शक्यतेला ‘आप’ने नकार दिलेला नाही. आमची राजकीय विषयांची समिती दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या कार्यकर्ते तसेच नेत्यांचा विचार घेऊन निर्णय करू, असे पक्षाने म्हटल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने शीखविरोधी दंगलीत दोषी ठरविले होते. त्या प्रकरणी फुलका यांनी पीडितांची बाजू मांडली होती.

Leave a Comment