राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला उत्तर देणारे एक व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल

raj-thakre2
मुंबई – भाजप आणि त्यांच्या समर्थकांना राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवर काढलेले व्यंगचित्र चांगलेच झोंबल्याचे दिसून येते आहे. कारण ‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९’ या फेसबुक पेजवर राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्राला उत्तर देणारे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे.

हे व्यंगचित्र राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रात अनेक बदल करून पोस्ट करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या रुपात एक पोपट या व्यंगचित्रात दाखवण्यात आला आहे. बोलघेवडा पोपट असे नाव त्याला देण्यात आले आहे. त्यानंतर एका खुर्चीवर शरद पवार आणि एका खुर्चीवर राज ठाकरे बसलेले दिसत आहेत. राज ठाकरे यांनी साहेब बोला काय विचारू? असे विचारताच, सेट करून दिलेले मोदी विरोधी प्रश्नच पाळीव पत्रकारांनी विचारा उत्तर तयार आहे, असे पवार म्हणताना दिसत आहेत. बारामतीच्या पोपटाने घेतलेल्या मुलाखतीत बारामतीच्या साहेबांनी मोदींवर पुन्हा टीका केली अशा बातमीचा मथळाही व्यंगचित्रात आहे. तसेच या व्यंगचित्राला क्रोध मोदींच्या यशाचा असे शीर्षकही देण्यात आले आहे. तर राज ठाकरे बसले आहेत त्यामागे राजाला साथ द्या या गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत आणि मनसेचे इंजिन पुलावरून कोसळते आहे असे दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर या व्यंगचित्राला एक सेटिंगवाली मुलाखत असेही शीर्षक देण्यात आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी शोध मराठी मनाचा या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेतली होती हे व्यंगचित्र त्याच मुलाखतीचा संदर्भ वापरून रेखाटण्यात आले आहे. पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९ हे भाजपचे फेसबुक पेज नाही. पण त्यांच्या समर्थकांनी हे फेसबुक पेज तयार केले आहे. हे व्यंगचित्र याच फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment