गुरुवायूर मंदिरात आजही पाहायला मिळतात शिंगे असलेले नारळ

guruvayur
केरळला गॉडस ओन कंट्री असे म्हटले जाते. अतिशय सुंदर निसर्ग आणि अनेक प्राचीन मंदिरे यांनी केरळच्या सौंदर्याला अधिक मोहक बनविले आहे. केरळच्या थिसूर जवळचे गुरुवायूर मंदिर केरळ मधील अनेक हिंदू कुटुंबाची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. भगवान कृष्णाचे बाळरुप असलेली अतिसुंदर मूर्ती येथे आहेच पण विष्णूच्या दशवातारांचे दर्शनही येथे होते. आदि शंकराचार्य येथे काही काळ वास्तव्यास होते आणि आजही त्यांनी घालून दिलेल्या नियमानुसार येथे पूजा अर्चा केली जाते. एकादशी उत्सव येथे फार मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.

या मंदिराची कथा अशी कि कृष्णाची द्वारका नगरी बुडाली तेव्हा येथील कृष्ण मूर्ती त्यात वाहून गेली. ती मूर्ती बृहस्पतीना तरंगताना दिसली तेव्हा त्यांनी वायुदेवतेची मदत मागितली आणि हि मूर्ती योग्य स्थानी स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रवास सुरु केला तेव्हा ते केरळात पोहोचले. मग येथे हि मूर्ती स्थापन केली गेली. बृहस्पती हे देवांचे गुरु आणि वायू देवता यांच्या नावावरून या ठिकाणाला गुरुवायूर असे नाव पडले. आजही या मंदिरात फक्त हिंदुना प्रवेश करता येतो.

अशीही कथा सांगतात कि एक शेतकरी त्याच्या झाडाचे पहिले नारळ कृष्णाला अर्पण करण्यासाठी जात असताना जंगलात त्याला डाकूंनी अडविले तेव्हा त्याने माझ्याजवळचे सगळे घ्या पण देवाचे हे नारळ घेऊ नका अशी विनंती त्यांना केली तेव्हा डाकू म्हणाले नारळाला काय शिंगे आहेत काय? तेव्हा खरोखरच नारळाला शिंगे आली हे पाहून घाबरलेले डाकू पळून गेले. हे शिंगे असलेले नारळ आजही या मंदिरात पाहायला मिळतात.

Leave a Comment