सिडनी कसोटी; पुजाराचे शतक, भारत दिवसाअखेर ४ बाद ३०३ धावा

cheteshwar-pujara
सिडनी – सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात चेतेश्वर पुजाराने शानदार शतक साजरे केले. त्याने चौथ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी २५० चेंडूमध्ये १३० धावांची झुंजार खेळी करत कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील आपले १८ वे शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर आणि या मालिकेतील पुजाराचे हे तिसरे शतक ठरले.


भारताने पुजाराच्या शानदार शतकाच्या जोरावर पहिल्या दिवसअखेर ४ गडी गमावत ३०३ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा चेतेश्वर पुजारा १३० आणि हनुमा विहारी ३९ धावांवर खेळत आहेत. कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. २३ धावांवर तो बाद झाला. तर ७७ धावा करत मयंक अगरवालने भारताला चांगली सलामी दिली. पण भारताचा दुसरा सलामीवीर के. एल. राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो ९ धावा काढून बाद झाला. रोहित शर्माच्या जागी या सामन्यात राहुलला संधी देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने २ तर स्टार्क आणि लायन यांनी प्रत्येकी १ गडी गारद केला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Comment