ट्रम्प यांच्या शटडाऊनमुळे संसद सदस्याकडून पगार दान

donald-trump
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षातील वादामुळे अमेरिकेत सरकारी कामकाज ठप्प झाले आहेत. यामुळे अनेक लोकांना पगार मिळत नसून याच्या निषेधार्थ एका महिला सिनेटरने आपला पगार दान करण्याची घोषणा केली आहे.

मॅसॅच्युसेट्स प्रांतातून सिनेटवर निवडून आलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या एलिझाबेथ वॉरेन यांनी ही घोषणा केली आहे. “मॅसॅच्युसेट्समधील सात हजार लोकांना एक तर घरी पाठवले आहे किंवा पगाराविना काम करण्यास सांगितले गेले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जोपर्यंत पुन्हा सरकारी कामकाज सुरू करत नाहीत, तोपर्यंत मी माझा पगार शरणार्थ्यांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेला दान करत आहे,” असे ट्वीट एलिझाबेथ वॉरेन यांनी केले आहे.

याच्या एक दिवस आधी वॉरेन यांनी 2020 मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे सूतोवाच केले होते. अध्यक्षपदाच्या नामांतराची प्रक्रिया ज्या राज्यातून सुरू होते त्या आयोवा प्रांतात या आठवड्याच्या शेवटी जाण्याची त्यांची योजना आहे.

मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी 5.7 अब्ज डॉलरच्या (सुमारे 40 हजार कोटी) निधीला अमेरिकन काँग्रेसने मंजुरी दिली नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी सरकारी खर्चासाठीच्या तरतुदींच्या बजेटवर स्वाक्षरी केली नाही. यामुळे अमेरिकेत शटडाऊन झाले असून अनेक सरकारी खाती बंद झाली आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचा ही भिंत बांधण्यास विरोध आहे.

Leave a Comment